ही कथा काल्पनिक असून, त्याचा कोणत्याही व्यक्तीशी, घटणेशी काहीही संबंध नाही. असा संबंध दिसल्यास योगायोग समजावा.
कथा लिहण्यामागे आपण आपल्या आणि प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी आणि आजार झाल्यास योग्य ते उपचार वेळ वायाला न घालवता घ्यावेत हा उद्देश आहे.
*एक मित्र होता*
खूप वर्षांनी आज शाळेत गेट टुगेदर चा कार्यक्रम झाला होता. जुने मित्र भेटले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तीच शाळा, तोच वर्ग आणि काळाच्या ओघात झालेले बदल, सगळ कसं रिफ्रेशिंग होतं. बालपणीचा तो एक मित्र पण भेटला. गप्पा टप्पा झाल्या नंतर मला कार पर्यंत सोडवायला आला. निघताना माझ्या बायकोला म्हणाला 'वहिनी.. आमच्या मित्राची काळजी घ्या '.. वगैरे.. बायकोला फारच अप्रूप वाटलं.. 'तुझ्या मित्राला फारच तुझी काळजी हा' असं काहीतरी चेष्टेने बोलली..
तर असा हा आमचा हा मित्र.. खूपच social.. अनेक कामात हिरीरीने भाग घेणारा, मदतीला धाऊन जाणारा.. सगळंच चांगलं पण गुटख्याचं एक व्यसन मात्र होतं त्याला.. त्याच्या म्हणण्याला नुसार आता त्याने ते सोडलं होतं.
नंतर काही दिवसांनी मला त्याचा फोन आला. म्हणाला की दात जरा दुखत आहे खूप दिवसांपासून आणि औषधे घेऊन पण दुखणं थांबत नाही. मित्राला clinic ला बोलावलं. दुसऱ्या दिवशी तो आला. तपासणी केली.. दात हलत होता, पण दात हलण्याच कारण मात्र वेगळंच दिसत होतं. लक्षणं कॅन्सर ची दिसत होती. त्याला मी लगेच Biopsy करून घेऊ असा सल्ला दिला. निदान झाल्याशिवाय दाताची कोणतीही treatment शक्य नाही हे सांगितलं. पण तो काही ऐकत नव्हता. Biopsy ला घाबरला होता की अजून काही माहीत नाही. खूपदा समजावून सुध्दा मित्रानी biopsy चा सल्ला ऐकला नाही. तात्पुरते वेदनाशामक घेऊन उपचारविना तो परत गेला.
तीन महिन्यानंतर मित्राचा परत फोन आला. भेटायचं आहे म्हणाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मित्र क्लिनिक ला आला. त्याची तपासणी केली. या वेळी मात्र आजाराची लक्षणं जास्त तीव्र दिसत होती. Biopsy साठी या वेळी त्याला विनंती नाही तर दम दिला. शेवटी तो तयार झाला. Biopsy नंतर जर कॅन्सर detect झाला तर लवकरात लवकर surgery करावीच लागेल हे सांगितलं. 100% करणारच असं तो म्हणाला. या वेळी त्याला पण याची जाणीव झाली होती. Biopsy घेतली आणि Face neck CT साठी letter दिलं.
2 दिवसांनी Lab चे reports आले.. तोंडाचा कर्करोग (modereately differentiate oscc).. मित्राला आणि त्याच्या आई-वडीलांना बोलवून घेतलं. आजाराची गंभीरता आणि immediate Surgery विषयी counselling केलं. मित्राची सगळी कल्पना असल्याने Government scheme मधून Surgery कशी करता येईल हे समजावून सांगितलं. पण मित्र आमचा हट्टी.. ऑपरेशन केलं तर फक्त मोठ्या नामांकित हॉस्पिटल मधूनच करणार, ते ही फ्री मध्ये करणार असल्या illogical हट्टीपणा वर अडून बसला. मी त्याला विचारलं की कसं शक्य करणार? विचारल्यावर म्हणे माझे पॉलिटिकल संबंध आहेत, त्या तून 100% होणार, ते पण झीरो payment नी. त्याला या सर्व गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नकोस, हे सांगण्याचा एक अयशस्वी प्रयत्न परत मी केला. एक तर gov scheme मधून करून घे किंवा लहान हॉस्पिटल मध्ये पण कमी खर्चात होते surgery हे त्याला खूपदा सांगितलं. पण एक आठवड्यात मी 'त्याच' मोठ्या हॉस्पिटल मधून फ्री मध्ये surgery करून घेणार, असं सांगून मित्राने निरोप घेतला. त्याच्या आई-वडिलांची with or without government scheme treatment ची तयारी होती, खर्च झाला तरी तो करण्याची तयारी होते. पण व्यर्थ. त्याचा हट्टीपणा आणि त्यामुळे काळजीत पडलेले त्याचे आई-वडील मी हताशपणे पाहत राहिलो.
त्या नंतर प्रत्येक 2-3 दिवसांनी मी मित्राला फोन करून update घेत राहिलो.. प्रत्येक वेळी 2 दिवसांत ऑपरेशन प्लॅन असल्याचं ऐकायचो. नंतर calls कमी होत गेले.
एक दिवस बायकोने विचारलं की मित्राची surgery झाली की नाही अजून? मी म्हणालो उद्या त्याला call करून विचारतो. दुसऱ्या दिवशी त्याला call करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. Call करण्याआधी सहज म्हणून WhatsApp open केलं.. मित्राच्या निधनाचा पहिलाच मेसेज.. वाचून गहिवरून आलं. Call झालाच नाही.. आता परत कधी होणार नाही.. मैत्रीच्या दुनियेतला बादशहा आज कायमचा निघून गेला होता. हतबल आई-वडिलांच्या वेदनांचा फक्त अंदाजच येत होता.
का झालं असेल असं? आरोग्याबाबत इतकी उदानासीता.. चांगला सल्ला देणारे मित्र आणि डॉक्टर्स अवतीभवती असताना पण तुम्ही इतके हट्टी कसे राहू शकता? माझ्या बरोबर त्याच्या जवळच्या काही इतर मित्रांनी सुध्दा त्याला कित्येकदा समजावलं होता.
मित्र कशाने गेला.. आजाराने? की हट्टी पणाने? दुर्लक्षामुळे? आजारावर उपचार होते, मग वेळेत उपचार घेतले असते तर अजून काही वर्षे निरोगी आयुष्य जगता आलं असतं ना..
मित्र आज नाही आपल्यात, पण ही किंवा अशीच वेळ माझ्या इतर कोणत्याही मित्र मैत्रिणींवर येऊ नये, या साठीच हे सर्व लिहण्यामागील कारण...
या मधून आपण काय शिकायचं आहे..
>आजार होऊ नये म्हणून काळजी घ्या
>आजार झाल्यास लवकरात लवकर उपचार घ्या
>कोणत्याही pathy ला मी नावं ठेवत नाही.. पण जिथे surgery हाच उपाय असतो, तिथे parallel उपचार शोधण्यात वेळ वाया घालवू नये.
>उपचाराला टाळाटाळ करताना जन्मदात्यांचा विचार करा.
>आधुनिक शास्त्र खूप प्रगतीत झाला आहे आणि रोज त्यात संशोधन होत आहे. उपचार आहेत आणि त्या मुळे आयुष्य निरोगी बनत आहे. फक्त उपचार करून घेतले पाहिजेत.
>तोंडाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, प्रत्येक ulcer काही कॅन्सर नसतो, तरीसुद्धा घाबरून न जाता आणि स्वतःच Google search करण्यापेक्षा , डॉक्टरांना अवश्य दाखवावं.
>सुपारी सुद्धा न खाणाऱ्या लोकांना सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, आणि त्याची अनेक कारणं असू शकतात.
>शरीरामध्ये होणारे बदल, गाठी शंका आल्यास न लाजता डॉक्टरांकडून तपासून घ्याव्यात.
>शंकांचं वेळेत निरसन करणं गरजेचं असतं. फक्त वेळ वाया घालवू नका.
>Health Insurance असायलाच पाहिजे. आणि त्यात कोणते आजार समाविष्ट आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे
>शेवटी आणखी एक महत्त्वाचं..आपापल्या कुवती प्रमाणे हॉस्पिटल्स ची निवड करावी. Government Hospitals आजिबात वाईट नसतात. उलट अशाच हॉस्पिटल्स मधूनच मोठे डॉक्टर्स निर्माण होत असतात.