‪#‎घरोघरी_आयुर्वेद‬

डिलिव्हरीनंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही?

सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया.

- तेलाचे मालिश करावे का?
पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश करण्याची पद्धत आपल्याकडे होती. प्रसूतीच्या काळात या दोघांवरही शारीरिक ताण पडत असल्याने वात वाढीला लागतो. हा वात आटोक्यात आणण्यासाठी दोघांनाही कोमट बला तेल किंवा अगदी सध्या तीळ तेलाचे मालिश करणे आवश्यक ठरते. त्यामुळे तसे मालिश अवश्य करावे.

- पोट बांधणे 
बाळंतीणीचा गर्भाशय प्रसूतीनंतर त्याच्या मूळ आकारावर पुन्हा जायला; म्हणजे आक्रसायला सुरुवात होते.
अशा स्थितीत वात वाढू नये. तसेच शरीर बेढब दिसू नये याकरता आयुर्वेदाने सांगितलेला मार्ग म्हणजे उदरपट्टबंधन अथवा पोट बांधणे. यासाठी पंचाचा वापर केला जातो. अर्थात; ही क्रिया नैसर्गिक प्रसूतीनंतर आणि आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायची आहे.

- काय खावं?
बाळासाठी अर्थातच मातेचे दूध हेच सर्वोत्तम अन्न आहे असे थोर आयुर्वेद वैद्य श्रीमद्वाग्भटाचार्य ‘मातुरेव पिबेत् स्तन्यं तत् परं देहवृद्धये|’ इतक्या स्पष्ट शब्दांत सांगून गेले आहेत. बाळंतीणीच्या आहाराबाबत काळजी दुहेरी असते. इथे स्वतःच्या शरीराची झीज भरून काढणे आणि बाळासाठी स्तन्यनिर्मिती नीट व्हावी या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. वेगवेगळ्या खीरी, लाडू यांचा आहारात समावेश करावा. आईस्क्रीम वा दह्यासारखे पदार्थ शक्यतो टाळावेत. असे पदार्थ मातेच्या आहारात असल्यास तिच्या दुधामार्फत बाळापर्यंत अतिरिक्त कफ पोहचून त्यास त्रास होवू शकतो.

- बाळगुटी द्यावी का?
अलबत द्यावी. मात्र याविषयी आपल्या वैद्यांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. (बाळगुटी या विषयावरील विस्तृत लेख लवकरच प्रकाशित होणाऱ्या #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल.) वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळगुटीचा उपयोग अवश्य करावा.

बाळंतपण झाल्यावर वरील गोष्टी करू नका असं सांगण्याची सध्या फॅशन निघाली आहे. या गोष्टी नेमक्या का आणि कशा करतात हेच असे सांगणाऱ्यांना माहित नसते. त्यामुळे; वरीलपैकी कोणत्याही गोष्टी करू नयेत असा सल्ला कोणीही दिल्यास दुर्लक्ष करा. आणि यांपैकी कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांचे चिकित्सालय गाठा. पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!

बाळाला आईचे दुध कधीपर्यन्त ? बाळाला वरचे अन्न कधी सुरू करायचे ? चौथ्या महिन्यापासुन ? सहाव्या महिन्यापासुन ? तर नाही..... जोपर्यन्त बाळाला दात यायला सुरूवात होत नाही तोपर्यन्त ते क्षीराद अवस्थेत आहे असे समजावे... मग वरचे अन्न सुरू करण्याचा काळ सातवा, आठवा , नववा महिना असा प्रतिबाळ बदलू शकतो... पण सध्या आयांना चौथ्या महिन्यापासुनच कधी एकदा त्या बाळाचे ओव्हरपोषण सुरू करू असे होऊन जाते...आणि मग बाजारू पोषणकल्पांनी गँसेस, अपचन इ. सुरू झाले की त्यावर बाजारू औषधांचा मारा सुरू होतो. मुळात दात आल्याशिवाय बाळ जर बाहेरचे अन्न पचवुच शकत नाही तर ते द्यायचेच कशाला? सहाव्या महिन्यात वरचे अन्न सुरू केल्यावर त्रास होत असला की बालरोगतद्न्य सांगतात की पालथे झोपवा, एक दोन महिन्यात आपोआप बरे होईल...आपोआप ? प्रत्यक्ष प्रमाण मानणारे शास्त्र "आपोआप " मानते? हे आपोआप बरे होणे आपोआप नसुन एक दोन महिन्यांनी येणारे दात व त्या वयानुसार उत्पन्न होणारी बाह्यपदार्थपचनशक्तीचे काम आहे....अस्तु... इत्यलम् ।

 वैद्य परीक्षित स. शेवडे, Manish n group
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)